Queen Elizabeth’s Three Visits To India Know About Details

  0
  12


  Elizabeth II On India Tour: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Elizabeth II On India Tour) यांचे गुरुवारी निधन झाले. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ विराजमान होत्या. एलिझाबेथ यांचा ब्रिटनची महाराणी म्हणून 1952 मध्ये राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी त्या अवघ्या 25 वर्षांच्या होत्या. ब्रिटनची महाराणी म्हणून त्यांनी तीन वेळेस आपले पती प्रिन्स फिलीप यांच्यासोबत भारत दौरा केला होता. 

  महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप हे तीन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते. त्यांचा भारत दौरा हा 1961, 1983 आणि 1997 साली झाला होता. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले होते. 

  पहिल्या दौऱ्यात काय झालं?

  स्वतंत्र भारतात ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या सदस्यांचा पहिला दौरा 21 जानेवारी 1961 मध्ये पार पडला होता. भारताच्या पाहुणे असलेल्या महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे शाही पद्धतीने स्वागत करण्यात आले. दिल्लीतील पालम विमानतळावर  त्यांचे स्वागत राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले. महाराणी एलिझाबेथला पाहण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी लोकांच्या हातात भारत आणि ब्रिटनचे राष्ट्रध्वज होते. महाराणी एलिझाबेथ या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यादेखील होत्या. पहिल्या दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाटवर जाऊन आंदरांजली अर्पण केली होती. 

  ब्रिटनच्या शाही जोडप्याने ताज महाललादेखील भेट दिली होती. त्याशिवाय, मुंबई, वाराणसी, उदयपूर, जयपूर, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता शहरादेखील भेट दिली होती. 

  दुसऱ्या दौऱ्यात मदर तेरेसा यांचा सन्मान 

  ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय 1983 रोजी भारत दौऱ्यावर आल्या होत्या. हा दौरा 9 दिवसांचा होता. यावेळी त्यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. या दौऱ्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. दिल्लीतील हैदराबाद हाऊसचे सहा महिने नुतनीकरण सुरू होते. कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. एलिझाबेथ यांच्या आवडीचे जेवण तयार करण्यासाठी खास स्वयंपाकी ठेवण्यात आले होते. या दौऱ्यात माध्यमांचे त्यांच्यावर विशेष लक्ष होते. 

  या दौऱ्यात एलिझाबेथ यांनी थोर समाजसेविका मदर तेरेसा यांना ब्रिटिश सरकार देत असलेल्या अवॉर्ड ऑफ मेरिटने सन्मानित केले. राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांनी शाही जोडप्यांचे स्वागत केले होते. राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

  भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात सहभागी 

  महाराणी एलिझाबेथ यांचा शेवटचा भारत दौरा हा 1997 मध्ये झाला. राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांचे स्वागत केले होते. 1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती. एलिझाबेथ यादेखील स्वातंत्र्यच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी झालेल्या. आपल्या अखेरच्या भारत दौऱ्यात त्यांनी काही धार्मिक स्थळांचा दौरा केला होता. 

  पंजाबमधील अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला त्यांनी भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी सँडल घातली नव्हती. मात्र, पायात मोजे होते. महाराणी एलिझाबेथ यांनी जालियानवाला बागेत जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. याठिकाणी ब्रिटिशांनी 1919 मध्ये भीषण गोळीबार केला होता. यामध्ये शेकड निष्पाण नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. 

  भारतीय पंतप्रधानांचे स्वागत

  ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय पंतप्रधानांचे स्वागत महाराणी एलिझाबेथ यांच्याकडून होत असे. आपल्या 70 वर्षाच्या सम्राज्ञीपदाच्या कार्यकाळात एलिझाबेथ यांनी भारताच्या 18 पंतप्रधानांच्या भेटी घेतल्या होत्या. तर, 1963, 1990 आणि 2009 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी ब्रिटनचा दौरा केला होता. त्यांचे स्वागतही महाराणी एलिझाबेथ यांनी केले होते.     Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here