Money Laundering Case Jacqueline Fernandez  will Be Investigated In The 200 Crore Money Laundering Case

0
5


Jacqueline Fernandez : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आज दिल्लीत चौकशीसाठी हजर राहणार आहे. EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखा आज सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची चौकशी करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन आज (14 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता EOW च्या कार्यालयात पोहोचणार आहे. याआधी तिला सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु काही कारणांमुळे ही चौकशी पुढे ढकलण्यात आली होती.

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar Case) प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवर असून, अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या प्रकरणात दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोरा फतेहीचे (Nora Fatehi) नावही समोर आले होते. जॅकलिनला देखील याआधी 12 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण, काही कारणांमुळे जॅकलिन 12 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहू शकली नाही. त्यामुळे तिला आज (14 सप्टेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे समन्स पोलिसांनी दिले होते.

नेमकं प्रकरण काय?

सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक व्यावसायिक असून, सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली होती. सुकेशने राजकारण्यांच्या नावाने सव्वा कोटी रुपये उकळले होते. कधी करुणानिधी, कधी कुमारस्वामी, कधी जयललितांच्या नावाचा वापर केला. 2017 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात त्याने डील करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्याने दाखवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली. त्याच्या हॉटेल रुममध्ये सव्वा कोटी रुपये जप्त केले. अटक झाल्यानंतरही सुकेशने दिल्लीतल्या तुरुंगातूनच खंडणी वसुली सुरु केली होती.  सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. 2013 मध्ये चेन्नईच्या कॅनरा बँकेलाही त्याने चुना लावला.

जॅकलिनला दिल्या महागड्या भेटवस्तू

सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) नाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता.

अनेक अभिनेत्रींना अडकवण्याचा प्रयत्न

सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला, तर काहींनी नाकारल्या होत्या. 

संबंधित बातम्या

Jacqueline Fernandez : ‘नोरा फतेही साक्षीदार मग मी आरोपी का?’ जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल

Jacqueline Fernandez : “मी माझ्या कष्टाने संपत्ती कमावली”; मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here