Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाल्यानं मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यामध्ये मैत्री होती. जेव्हा विक्रम गोखले यांचे मुंबईमध्ये घर नव्हते तेव्हा बिग बींनी त्यांना मदत केली होती.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विक्रम गोखले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे राहायला घर नव्हते. विक्रम गोखले हे मुंबईत राहण्यासाठी घर शोधत होते. एका मुलाखतीत विक्रम गोखले यांनी सांगितलं होतं की, अमिताभ यांनी त्यांना मुंबईत घर मिळवून देण्यासाठी मदत केली होती.
‘स्ट्रगलच्या काळात जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. राहण्यासाठी डोक्यावर छप्पर नव्हते, मी राहण्यासाठी घर शोधत होतो. अमिताभ बच्चन यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये मला घरासाठी मदत करण्याची शिफारस करण्यात आली होती. बिग बींच्या मदतीने मला महाराष्ट्र सरकारकडून सरकारी निवासस्थान मिळाले.’ असं विक्रम गोखले यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
विक्रम गोखले यांनी सांगितलं होतं की,’मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की, आम्ही दोघे गेल्या 55 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि चांगले मित्र आहोत.’ अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांनी परवाना, अग्निपथ आणि खुदा गवाह यांसारख्या हिट हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
News Reels
एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते. अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तसेच या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री या व्यक्तीरेखनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Vikram Gokhale: भूमिका जगणारा आणि भूमिका घेणारा कलावंत!