Pope Benedict XVI: व्हेटिकन सिटीचे माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज, स्थानिक वेळ सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी 2013 मध्ये ख्रिश्चन धर्मगुरुंचे सर्वोच्च पद समजल्या जाणाऱ्या पोप पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती.
काही दिवसांपूर्वी ते व्हॅटिकन गार्डनमधील एका लहान मठ मेटर एक्लेसियामध्ये वास्तव्य करत होते.
बेनेडिक्ट 16 वे यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. व्हेटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांनी सांगितले की, माजी पोप बेनेडिक्ट 16 वे त्यांना भेटण्यासाठी येत असे. बेनेडिक्ट यांच्या वाढत्या वयानुसार, त्यांची प्रकृती ढासळत होती. बुधवारी पोप फ्रान्सिस यांनी बेनेडिक्ट 16 वे यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.
बेनेडिक्ट 16 वे यांचा जन्म जर्मनीत झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव जोसेफ रॅत्झिंगर होते. बेनेडिक्ट यांना 2005 मध्ये व्हेटिकन सिटीचे पोप म्हणून निवडण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे वय 78 वर्ष होते. सर्वाधिक वय असणाऱ्या पोप पैकी एक होते. जवळपास आठ वर्ष ते रोमन कॅथलिक चर्चचे पोप होते. वर्ष 2013 मध्ये त्यांनी स्वेच्छेनुसार पोप पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
News Reels
पोप कोण असतात?
पोप हे कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू असतात. ईसा मसीहानंतर पोप हे पद सर्वोच्च मानले जाते. पोप याचा अर्थ वडील असा होतो. पोप पद हे आजीवन असते. मात्र, पोप बेनेडिक्ट यांनी स्वत: हून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.
कोणताही कॅथलिक पुरुष, ज्याचा बाप्तिस्मा विधी झाला असेल तो पोप पदावर जाऊ शकतो. हा विधी झाल्यानंतर ती व्यक्ती कॅथलिक झाली आहे, असे समजले जाते.
पोप यांच्या निवडीची प्रक्रिया अंत्यत गोपनीय असते. पोप यांची निवड कार्डिनलच्या माध्यमातून होते. व्हॅटिकनमध्ये ही निवड प्रक्रिया पार पाडली जाते. कॅथलिक धर्मात कार्डिनल यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जगभरात एकूण 184 कार्डिनल आहेत. यामध्ये पाच भारतात आहेत. हे कार्डिनल त्या-त्या देशांमध्ये सर्वात मोठे कॅथलिक धर्मगुरू म्हणून ओळखले जातात.
पोप यांची निवड प्रक्रिया सुरू असताना कार्डिनल यांचा जगापासूनचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. कोणताही पत्रव्यवहार, फोनवरून संपर्क साधला जात नाही.