Air Pollution On Earth Everywhere Air Is Poisonous Scary Revelations Says Study

    0
    9


    Air is Poisonous on Earth : वायू प्रदूषणाची (Air Pollution) समस्या दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे. याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे खोकला, घसादुखी, श्वसनासंबंधित आजार, डोळ्यात जळजळ, शरीरात थकवा जाणवणं यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. वाढतं वायू प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, जगात अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे हवा स्वच्छ आणि शुद्ध आहे. दिवसेंदिवस हवा अधिकाधिक विषारी होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जगातील केवळ 0.0001 टक्के लोकसंख्या कमी प्रदूषित हवेत जगत आहे. वर्षभरातील 70 टक्के दिवसात हवा प्रदूषित राहते.

    पृथ्वीवर सर्वत्र विषारी हवा

    ‘द लॅन्सेट’ (The Lancet) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात वायू प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलं आहे. या अहवालामध्ये जगभरातील वायू प्रदूषणाचा अभ्यास आणि गणना करण्यात आली आहे. हा या प्रकारचा पहिला अहवाल आहे. मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने या अहवालासाठी पुढाकार घेतला. त्याचा अहवाल नुकताच ‘द लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

    प्रदूषणाची वाढती समस्या

    पीएम म्हणजे हवेतील विविध कणांचे त्यांच्या व्यासानुसार म्हणजेच आकारानुसार वर्गीकरण केलं जातं. यासाठी PM हे एकक वापरलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, कोणत्याही माणसासाठी शरीरात दररोज प्रवेश करणारे पीएम 2.5 हवेचे कण 15 पीजी/एम3 पेक्षा जास्त नसावेत. दरम्यान हे प्रमाण 2000 ते 2019 या वर्षात सरासरी दुप्पट होतं. हा अभ्यास 65 देशांमधील 5446 मॉनिटरिंग स्टेशन्समधून घेतलेल्या डेटाच्या आधारे करण्यात आला, यामध्ये पूर्व आशिया सर्वात प्रदूषित असल्याचं आढळून आलं आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आशिया आहे. सर्वात कमी प्रदूषण उत्तर आफ्रिकेमध्ये आहे.

    हवामान बदलाचा प्रभाव

    वातावरणातील बदलाचा परिणाम वायू प्रदूषणावरही होतो. उत्तर पश्चिम चीन आणि उत्तर भारतात हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलमुळे प्रदूषण वाढतं. त्याच वेळी, जंगलातील आगींमुळे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर उन्हाळ्यात वायू प्रदूषण वाढतं. यामुळे तेथील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खराब होते.

    ‘या’ भागात सर्वात कमी प्रदूषण

    गेल्या दोन दशकांत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये PM 2.5 चं सर्वात कमी प्रदूषण आढळून आलं. यानंतर ओशिनिया आणि दक्षिण अमेरिकेत प्रदूषण कमी आहे. 2000 ते 2019 दरम्यान युरोप आणि उत्तर अमेरिकेत वायू प्रदूषणाची पातळी कमी झाली असली तरी आशिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

    मोनाश युनिव्हर्सिटीचे हवेच्या गुणवत्तेचे संशोधक युमिंग गुओ यांनी सांगितलं आहे की, या अभ्यासातून बाहेरील हवेचं प्रदूषण किती आहे, त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, हे कळलं आहे. याच्या मदतीने सरकारला नियम आणि कायदे तयार करण्यास मदत होईल.

    Check out below Health Tools-
    Calculate Your Body Mass Index ( BMI )

    Calculate The Age Through Age Calculator



    Source link

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here