Threat To Dollar Supremacy In International Market By Chinese Yuan Know In Details

  0
  20


  Threat to Dollar:  जगातील आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसमोरील आव्हाने येत्या काही काळात वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरचे वर्चस्व आहे. आता याच अमेरिकन डॉलरचे वर्चस्व संपुष्टात येणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याची चर्चा धरू लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देताना सांगितले की, रशिया आशियाई, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांसोबत चीनचे चलन युआनमध्ये व्यवहार करण्याच्या बाजूने आहे. 

  या प्रयत्नातून चीन आणि जगातील सर्वात मोठे ऊर्जा निर्यातदार रशिया यांना जागतिक आर्थिक व्यवस्थेतील डॉलरची धमक संपवायची आहे. जर असे घडले तर हा अमेरिकेच्या इतिहासात त्यांना बसणारा हा सर्वात मोठा धक्का असेल. संपूर्ण जगात अमेरिका सर्वात मोठे शस्त्र म्हणून डॉलरचा वापर करत आहे. जगाच्या उत्पादनापैकी 20 टक्के हिस्सा हा अमेरिकेचा आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांमध्ये ठेवलेल्या परकीय चलनाच्या साठ्यापैकी 60 टक्के रक्कम डॉलरमध्ये आहे.  20 वर्षांपूर्वी हे प्रमाण 70 टक्के होते. आंतरराष्ट्रीय व्यापारही केवळ डॉलरच्या माध्यमातून होतो.

  डॉलरमुळे अमेरिकेला मोठी मदत

  अमेरिकेला जागतिक राजकारण आणि आर्थिक पटलावर डॉलरमुळे वर्चस्व ठेवण्यास मोठी मदत मिळते. अमेरिका कोणत्याही देशावर आर्थिक निर्बंध लादू शकते आणि त्या देशाला जगात आर्थिकदृष्ट्या एकटे पाडू शकते. 

  इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्ट (International Emergency Economic Powers Act) , द ट्रेडिंग विथ द एनिमी अॅक्ट (Trading With the Enemy Act) आणि पॅट्रियट अॅक्ट (Patriot Act) हे अमेरिकेचे कायदे पेमेंट सिस्टमला शस्त्र म्हणून वापरण्यास अधिकार देते. जगभरातील चलन पुरवठ्यावर अमेरिका नियंत्रण ठेवते.

  पर्यायी व्यवस्थेवर भर

  स्विफ्ट (Society for Worldwide Interbank Financial Telecommunication) हे ग्लोबल मेसेजिंग पेमेंट सिस्टिमद्वारे आर्थिक घडामोडी, व्यवहारांमध्ये अमेरिकन डॉलरचा दबदबा कायम ठेवतात. चीन आणि रशिया हे देश स्विफ्टला पर्यायी ठरणारी व्यवस्था तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेले युद्ध आणि चीन-अमेरिकेतील तणावानंतर आता स्विफ्टच्या पर्यायावर अधिक जोर दिला जात असल्याचे चित्र आहे. त्यातूनच अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान दिले जात आहे. 

  रशिया आणि चीनच्या मध्यवर्ती बँका आता परकीय गंगाजळीत डॉलरचे प्रमाण कमी ठेवत असून युआनमध्ये व्यवहार करत आहेत. रशिया आणि चीन इतर देशांनाही व्यापारासाठी युआन स्वीकारण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीनला असे वाटते की याद्वारे अमेरिका आणि त्यांना बळ देणारे चलन डॉलरला सर्वात मोठे आव्हान दिले जाऊ शकते. असे झाल्यास अमेरिकेच्या आर्थिक ताकदीवर हल्ला करता येऊ शकतो. 

  सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या सौदी अरेबियाने चीनला तेल विकण्यासाठी युआन हे चलन स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमती युआनमध्ये निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत डॉलरमध्ये व्यवहार करण्यात येत होता. भारतानेही रशियाकडून डॉलर सोडून इतर चलनात भरून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.

  डॉलरच्या वर्चस्वाचे कारण काय?

  आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या वर्चस्वाची अनेक ठोस कारणे आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला एकच चलन आवश्यक आहे जे स्थिर आणि सहज उपलब्ध असेल. त्या चलनाद्वारे तुम्ही कधीही व्यवहार करू शकता. बाजाराने चलनाचे मूल्य नियंत्रित करणे अपेक्षित आहे. हे नियंत्रण कोणत्याही देशाने करणे अपेक्षित नाही. त्यामुळे डॉलरला मागणी आहे. त्यामुळे चिनी युआनला आंतरराष्ट्रीय अर्थकारणात डॉलरला आव्हान देणे सोपं नसणार.   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here