Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan Arrest) यांच्या अटकेसंदर्भात गुरुवारी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. न्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीवर न्यायलयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.
इम्रान खान (Imran Khan) यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यात आल्याने न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला तडा गेला असल्याचं पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court) म्हटले आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीश बंदियाल यांनी म्हटले की, ‘कोर्टात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले’. न्यायलयाने एनएबीला विचारले की न्यायलयातून कशी कोणाला अटक केली जाऊ शकते?
सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले की, ‘न्यायलयातील परिसरातातून कोणालाही अटक केली जाऊ शकत नाही’. एनएबीने न्यायालयाचा अपमान केला असल्याचं देखील खंडपीठाने म्हटले आहे. तसेच तातडीने इम्रान यांना न्यायालयात हजर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या सोबतच न्यायाधीश बंदियाल यांनी कोणत्याही राजकिय नेत्यांनी कोर्टाने येण्यास बंदी घातली आहे.
‘अटक करण्यापूर्वी परवानगी घ्यायला हवी होती’
इम्रान खान यांच्या अटकेवर न्यायलयाने म्हटले की, ‘जर एखाद्या व्यक्तीने जर कोर्टात शरणागती पत्कारली असेल तर त्याला अटक करण्यात काय अर्थ आहे? यामुळे भविष्यात कोणतीही व्यक्ती न्यायालयात कोणालाही सुरक्षित समजू शकणार नाही’. न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटले की अटक करण्यापूर्वी रजिस्ट्रारची परवानगी घ्यायला हवी होती.
सर्वोच्च न्यायलयाने एनएबीला फटकारले
वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. खंडपीठामध्ये मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायाधीश मुहम्मद अली मजहर आणि न्यायाधीश अतहर मिनल्लाह यांचा समावेश होता. सुनावणीदरम्यान न्यायाधीश अतहर मिनल्लाह यांनी म्हटले की, ‘निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अटक करण्यात येत आहे,एनएबी बऱ्याच वर्षांपासून असं करत आहे या पद्धतीला लवकरात लवकर थांबवणे गरजेचे आहे’.
सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीशांनी विचारले की, ‘एकूण किती जणांनी इम्रान खान यांना अटक केली?’ यावर इम्रान यांचे वकिल सलमान सफदर यांनी सांगितले की, ‘त्यांना 80 ते 100 लोकांनी अटक केली आहे’. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.